डॉ. राम ताकवले
प्राध्यापक राम ताकवले शिक्षणक्षेत्रात मोठा बदल घडवून आणणारे प्रवर्तक होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील काही मूलभूत समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ते पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे मानद प्राध्यापक होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL)चे संस्थापक संचालक, MKCL नॉलेज फाऊंडेशनचे मुख्य मार्गदर्शक आणि इंडियन कन्सोर्शिअम फॉर एज्युकेशनल ट्रान्सफॉर्मेशन (I-CONSENT)चे अध्यक्ष म्हणून मोलाची कामगिरी केलेली आहे.
ताकवले सरांचा जन्म ११ एप्रिल १९३३ रोजी सासवड तालुका, जिल्हा पुणे येथील हरगुडे गावात झाला. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण हरगुडे व सासवड येथे झाले. त्यांनी पुणे येथील विख्यात नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी आणि पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे त्यांनी मॉस्को स्टेट युनिव्हार्सिटीमधून पीएच.डी. केली. पुणे विद्यापीठात त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ भौतिकशास्त्र हा विषय शिकवले आणि अनेक विद्यार्थांना संशोधनासाठी मार्गदर्शन केले.
ते पुणे विद्यापीठ, पुणे (१९७८-८४), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (१९८९-९५) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली (१९९५-९८) या तीन विद्यापीठांचे कुलगुरू होते. ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली या विद्यापीठाचे संस्थापक होते. त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून (YCMOU) मानाची डी. लिट पदवी मिळाली आहे.
लोकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने, विशेषत: विविधता, विषमता, वंचितता आणि मोठ्या लोकसंख्येच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणे हा त्यांचा आयुष्यभराचा ध्यास होता. सहकारी आणि सहयोगी कार्य आणि शिक्षणाच्या मदतीने मूल्य आणि संपत्तीची विकासकेंद्रित निर्मिती करून नवीन शिक्षणाचे मॉडेल विकसित करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. यासाठी, त्यांनी परम विद्यापीठ आणि परम शाळा या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. शिक्षणाच्या व्यवस्थापनाकरता सायबरजग – व प्रत्यक्ष जग यांचा मिलाफ असणारी रचना विकसित करण्याचे प्रयत्न केले. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेची आमूलाग्र पुनर्रचना करणे आणि एकविसाव्या शतकातील एकमेकांना जोडलेल्या जगात आवश्यक असलेल्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी ती व्यवस्था सुयोग्य बनवणे हा त्यांच्या कार्यामागील उद्देश होता.
त्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी उपयुक्त असे अध्यापन – अध्ययन यांचे मॉडेल विकसित करून त्यानुसार राज्य व देश पातळीवरील मुक्त विद्यापीठाचे नवीन मॉडेल विकसित केले. त्यांच्या योगदानामध्ये मुक्त आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीचा विकास, कामाच्या ठिकाणी उपयुक्त असणारे प्रशिक्षण आणि दूरस्थ पद्धतीद्वारे शिक्षण, शेतकरी, उद्योग कामगार आणि शिक्षण मधूनच सोडलेल्या विद्यार्थांसाठी खुल्या शिक्षणाद्वारे अभ्यासक्रमांची ओळख, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापाठीच्या शिक्षणाममध्ये अभ्यासक्रमाची मुद्रित माध्यमालडून इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे वाटचाल करणे, OPENET कार्यक्रम विकास, मुक्त विद्यापीठ प्रणालीमध्ये दूरस्थ शिक्षणाचा परिचय करून , YCMOU आणि IGNOU मध्ये एम फिल. आणि पीएचडी कार्यक्रम आणि प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय कृती योजना विकसित करणे यांसारख्या महत्त्वाच्या कार्यांचा समावेश आहे.
प्रा. राम ताकवले अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आणि संस्थांशी संबंधित होते. ते असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (१९९४), व आशियाई असोसिएशन ऑफ ओपन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष (१९९५-९८), संस्थापक सदस्य आणि महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष (१९९४-९५) होते. ते कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग, व्हँकुअर, कॅनडा यांच्याशी ते जवळून संबंधित होते. ते COL पुनरावलोकन समितीचे सदस्य आणि COLच्या अध्यक्षांचे प्रादेशिक सल्लागार (दक्षिण आशिया) होते. ते भारतीय शिक्षण संस्था (IIE) पुणे येथे संचालकही होते. महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षणात माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. नेटवर्क फॉर एज्युकेशनल ट्रान्सफॉर्मेशनचे (NETRAचे) ते सचिव आणि इंडियन कन्सोर्शियम फॉर एज्युकेशनल ट्रान्सफॉर्मेशन (आय-कन्सेंट)चे अध्यक्ष होते. या संस्थेच्या स्थापनेची कल्पना त्यांचीच होती.
प्रा. ताकवले यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. यूके ओपन युनिव्हर्सिटी, या जगातील पहिल्या आणि अग्रगण्य मुक्त विद्यापीठाने ३० जून १९९९ रोजी मुक्त आणि दूरस्थ शिक्षणातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांना मिळालेल्या इतर सन्मानांमध्ये आणखी दोन मानद डॉक्टरेट पदव्यांचा समावेश आहे. त्यामध्ये AAOU तर्फे गुणवंत सेवा पुरस्कार, UGC चा प्रणवानंद सरस्वती पुरस्कार आणि शिक्षणासाठी चतुरंग पुरस्कार यांचा समावेश आहे. कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगने १ ऑगस्ट २००२ रोजी डर्बन कॉन्फरन्स, दक्षिण आफ्रिका येथे कॉमनवेल्थ देशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत COL ची मानद फेलोशिप देऊन डॉ ताकवले यांना सन्मानित केले. त्यावेळी हा सन्मान मिळवणारे भारताकडून ते एकमेव व्यक्ती होते.
शिक्षणाच्या भवितव्याबद्दल विलक्षण दूरदर्शी असणारे आणि काळाच्या पुढे पाहणारे ते शिक्षणतज्ज्ञ तर ते होतेच, पण त्याहीपलीकडे ते एक नम्र, संयमी, संवेदनशील, निर्भय, निरागस आणि पारदर्शी, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते.
महत्त्वाचे मानसन्मान
- ३० जून १९९९: यूके ओपन युनिव्हर्सिटीची सन्माननीय डॉक्टरेट पदवी.
- १० एप्रिल २०००: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार (रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई)
- १० फेब्रुवारी २००२: पुणे विद्यापीठातर्फे जीवन साधना गौरव पुरस्कार, भारतीय शिक्षण संस्था, पुणे (आयआयइ) विश्वस्त पद.
- ७ सप्टेंबर २००२: पुरंदरभूषण पुरस्कार, सासवड
- २५ जानेवारी २००३: प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे तर्फे ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर’ पुरस्कार.
- १ जुलै २००३: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ज्ञानदीप पुरस्कार.
- १२ नोव्हेंबर २००३: आशिया असोसिएशन ऑफ ओपन युनिव्हर्सिटीचे ‘ॲवॉर्ड ऑफ मेरिटोरियस सर्व्हिस’ हा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय.
- २९ नोव्हेंबर २००३: ब्रिटिश असोसिएशन ऑफ ओपन युनिव्हर्सिटीकडून सन्माननीय डी.लिट. पदवी.
- ७ फेब्रुवारी २००४:
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे तर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी.
- डॉ. बी. आर. आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, आंध्रप्रदेशतर्फे सन्माननीय डी. लिट.
- १ सप्टेंबर २००४: विद्यापीठ अनुदान आयोगाचा ‘स्वामी प्रणवानंद सरस्वती पुरस्कार’.
- २५ डिसेंबर २००९: चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’.
- २६ मार्च २०१८: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २४व्या दीक्षान्त समारंभात सन्माननीय डि.लिट. पदवी प्रदान.
- १९ नोव्हेंबर २०१८: ‘इग्नू’च्या ३३व्या स्थापन दिनानिमित्त व्याख्यान.
‘Nayee taleem@Digital India.’ - २९ फेब्रुवारी २०२०: Value Education in Digital and Artificial Intelligence Ages – Keynote Address, बहाई ॲकॅडमी, पाचगणी येथील राष्ट्रीय परिसंवादातील बीजभाषण.
- २०२१ : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणेतर्फे सन्माननीय डी. लिट.
विभूषित पदे
- चेअरमन – केरळ मुक्त विद्यापीठ निर्मिती समिती
- अध्यक्ष – महाराष्ट्र विज्ञान अकादमी (१९९४-९५)
- फेलो – द कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग, व्हॅंकुअर-कॅनडा
- संचालक – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (२०००-२०१०)
- संचालक – भारतीय शिक्षण संस्था (२००९-२०११)
- चेअरमन – शैक्षणिक परिवर्तनासाठी भारतीय संघ-(आय-कन्सेंट)
- विश्वस्त – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
- वनराई – विश्वस्त आणि सल्लागार
- सदस्य – महाराष्ट्र सरकारचा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग (२००५-२०१५)
- संस्थापक संचालक – पुणे विद्यापीठाची मुक्त शिक्षण संस्था
- प्रोफेसर एमिरेट्स – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- अध्यक्ष – असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (१९९४)
- अध्यक्ष – एशियन असोसिएशन ऑफ ओपन युनिव्हर्सिटीज (१९९५-९८)
- कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग, व्हॅंकुअर, कॅनडा येथील अध्यक्षांचे प्रादेशिक सल्लागार (दक्षिण आशिया)
- सदस्य – इंटरनॅशनल कौन्सिल फॉर डिस्टन्स एज्युकेशन
- चेअरमन – महाराष्ट्रातील विद्यापीठांचे उपविभाग आणि पुनर्रचना समिती. महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्ती.
- चेअरमन – राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (२००३-२००६)